अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर हापूस झाला स्वस्त   

आवक वाढली; ३ ते ४ हजार तयार मालाच्या पेट्या उपलब्ध 

पुणे : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीयाच्या मुहूर्तांवर मार्केटयार्डात मोठ्या प्रमाणात हापूस आंबा उपलब्ध झाला आहे. आवक वाढली असल्याने दरही आवाक्यात आहेत. बाजारात ४०० रूपयापासून ते ८०० रूपये डझनापर्यंतचा आंबा उपलब्ध आहे. अक्षय्यतृतीयासाठी बाजारात तयार मालाच्या ४ हजारापेक्षा अधिक पेट्या बाजारात उपलब्ध असणार आहेत. 
 
यंदा बदलत्या हवामानाचा फटका हापूसला बसल्याने उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून दरवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे २० ते २५ दिवस आधीच हापूसचा हंगाम संपणार आहे. उशीरापर्यंत राहिलेला पाऊस आणि कमी थंडीमुळे हापूसच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे हंगामाच्या पहिल्या टप्यात आवक कमी आणि दर अधिक होते. मात्र, आता आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तयार आणि कच्चा माल बाजारात अधिक प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे पेटी आणि डझनाच्या दरात घट झाली आहे. झाडांना फळ धारणा कमी असल्यामुळे यंदा १५ मे पर्यंतच हंगाम राहिल. त्यानंतर आवक एकदम घटणार आहे. त्यानंतर तुरळक आवक असेल, अशी माहिती व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली. 
 
बाजारात सद्य:स्थितीत चांगल्या प्रतीचा आंबा उपलब्ध आहे. तयार मालाच्या ५ ते ९ डझनाच्या पेटीला २५०० ते ४५०० रूपये, तर कच्चा मालाच्या ५ ते ९ डझनाच्या पेटीला १५०० ते ३५०० दर मिळत आहे. डझनाचा दर ४०० ते ८०० रूपये आहे. मार्केटयार्डातील फळ बाजारात रोज ४ ते ५ हजार पेटींची आवक होत आहे. मागीलवर्षी याच काळात रोज ७ ते ७.५ हजार पेटींची आवक होत होती. एका डझनाचा दर २५० ते ६०० रूपये होता. ४ ते ८ डझनाच्या कच्च्या मालाच्या पेटीची दर १००० ते २८०० रूपये होता. यंदा हापूसचे उत्पादन घटले असल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत दर थोडे अधिक असल्याचेही अरविंद मोरे यांनी नमूद केले.  
 
यंदा कोकणातील उन्हाला तीव्र आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे फळ लवकर तयार होत आहे. त्यामुळेच बाजारात तयार माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे अक्षय्यतृतीयाला दरात वाढ होणार नाही. दरवर्षी सुमारे १५ जूनच्या दरम्यान हापूसचा हंगाम संपत असतो. यंदा आंबा कमी आणि अधिकच्या उष्णतेमुळे तो लवकर तयार होत आहे. त्यामुळे १५ मे नंतर हंगाम संपणार असल्याचा अंदाजही अरविंद मोरे यांनी व्यक्त केला. 
 
हापूसचा हंगाम १५ मे पर्यंत 
 
सद्य:स्थितीत बाजारात चांगल्या प्रतीचा हापूस आंबा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. त्यामुळे ग्राहकांना अक्षय्यतृतीयाच्या मुहूर्तांवर हापूसची चव चाखता येणार आहे. यंदा कोकणात झाडांना फळे कमी लागली असल्याने शेतकर्‍यांच्या अंदाजानुसार हंगाम १५ मे पर्यंत संपेल. त्यामुळे 
हापूसची चव चाखण्यासाठी हा काळ उत्तम आहे. 
- अरविंद मोरे, व्यापारी, मार्केटयार्ड. 
 
बाजारातील हापूसचा दर
 
आंबा                      डझन                  दर
हापूस (तयार) ५ ते ९         २५०० ते ४५००
हापूस (कच्च) ५ ते ९          १५०० ते ३५००
हापूस (तयार) १ डझन          ४०० ते ८००

Related Articles